वनदुर्ग टिपागड - गडचिरोली

    महाराष्ट्रातील किल्ले म्हटलं की सह्याद्री पर्वतरांगेवरील किल्ले डोळ्यासमोरून तरळून जातात. पण आपल्या विदर्भातदेखील किल्लेरूपी ऐतिहासिक वारसा अजूनही तग धरून आहे. पूर्व विदर्भाला वनांच्या स्वरूपात एक वरदानच लाभलेलं आहे. येथिल वनांना सरकारकडून सरंक्षण मिळाल्यामुळे जैवविविधताही  मुबलक प्रमाणात आहे. ताडोबा-अंधारी, नवेगाव बांध, पेंच ही प्रसिद्ध अभयारण्ये पूर्व विदर्भाची शोभा वाढवतात. तसेच अंबागड, माणिकगड, प्रतापगड यासारखे वनदुर्ग हौशी भटक्यांना आकर्षित करतात. ह्या किल्ल्यांच्याच पंगतीतला, तेवढाच तुल्यबळ किल्ला म्हणजे टिपागड.

    टिपागड हा किल्ला गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात कोरची तालुक्यात, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेजवळ असलेला महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील किल्ला आहे. ह्या किल्ल्याची डोंगररांग समुद्रसपाटीपासून अंदाजे २००० फूट असणाऱ्या मुरुमगाव जमीनदारी परिसरात आहे. ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला गडचिरोलीमधील कोरची या तालुक्याच्या गावामधून कोटगुळ गाठावे लागते. कोटगुळपासून सावरगाव रस्त्यावर साधारण दहा किलोमीटरवर उजवीकडे टिपागडाचा फाटा लागतो. फाट्यापासून साधारण एक किलोमीटर अंतर गेल्यावर गाडी पार्क करून किल्ल्याची वाट धरायची. गाडीतून उतरल्यावर घनदाट जंगल, तिथली निरव शांतता आपले स्वागत करते. किल्ल्याकडे कूच करताना लगेचच एक ओढा लागतो, तो पार करून आपण मळलेल्या वाटेने किल्ल्याची चढाई सुरु करतो. दाट झाडीतून जाणाऱ्या वाटेमध्ये आपल्याल्या मोठमोठ्या शिळा लागतात. येथे फोटो काढायचा मोह मात्र आवरत नाही. परंतु, या परिसरात हिंस्र वन्य श्वापदांचा वावर आहे, त्यामुळे योग्य ती सावधानता बाळगावी.

गड चढताना वाटेत लागणाऱ्या शिळा

    साधारण पाऊण तासाच्या चालीनंतर आपल्याला तटबंदीचे दर्शन होते. गडाची एकूण तटबंदी साधारण दोन मैलांची आहे. तटबंदीला लागूनच डाव्या हाताला आपणास दगडाला शेंदूर फासलेला दिसतो. तसेच तिथे असलेल्या दगडावर सर्पशिल्प कोरलेले आहे आणि मध्यम स्वरूपाची हनुमानाची मूर्तीदेखील कोरलेली आहे. तटबंदीमधून आपण वर चढून गेल्यावर आपण किल्ल्यात प्रवेश करतो. लगेचच आपल्याला समोर किल्ल्यातील मुख्य आकर्षणापैकी एक, भव्य असा तलाव पाहावयास मिळतो. साधारण १५० मीटर व्यासाचा हा तलाव बघून चढाई करून आलेला थकवा क्षणात नाहीसा होतो. एवढ्या उंचीवर असणारा हा तलाव म्हणजे निसर्गाचा चमत्कारच आणि तो पाहिल्यावर मनमोहकतेची प्रचिती आल्याशिवाय रहात नाही. ह्या तलावाचे पाणी कधीच आटत नाही आणि तो विलक्षण खोलीचा आहे, असे स्थानिक लोक सांगतात.

गडावरील नयनरम्य मनमोहक भव्य तलाव

    हा तलाव म्हणजे इतिहासाचा मूक साक्षीदार आहे. पूर्वी या गडावर पुरम राजा नावाचा गोंड राजकुमार राज्य करत होता. ज्याच्याकडे २००० लढाऊ पुरुष, ५ हत्ती आणि २५ घोडे होते व त्याने संपूर्ण 'वैरागड देश' आपल्या ताब्यात ठेवला होता. त्या काळात या राजपुत्रानी लढाईच्या मैदानात दाखवलेले शौर्य आणि त्यातून कमावलेली संपत्ती यामुळे या राजपुत्राची आजूबाजूच्या परिसरात कीर्ती खूप वाढली होती. पुरम राजाची वाढत चाललेली कीर्ती पाहून छत्तीसगडच्या त्याच्याच साथीदारांनी त्याच्यापासून प्रांत हिसकावून घेण्याची शपथ घेतली. एके दिवशी छत्तीसगडचे एक आक्रमणकारी सैन्य त्याच्या अधिपत्याखालील परिसरात घुसले आणि पुरम राजाही त्यांची वाट रोखण्यासाठी पुढे सरसावला. त्याची कोटगुळ येथे प्रतिस्पर्धी सैन्याची गाठ पडली आणि तेथून काही अंतरावर असलेल्या टेकड्यांमध्ये संपूर्ण दिवसभर लढाई चालली. जिथे जिथे लढाई सर्वात जास्त कठीण वाटत होती तिथे तिथे स्वतः पुरम राजाने स्वार होऊन आपल्या तलवारीच्या जोरावर सर्व शत्रूंना जमीनदोस्त केले. संध्याकाळ होताच छत्तीसगडचे सैन्य माघार घेऊ लागले. लढता लढता राजकुमाराची एक नक्षीदार चप्पल जमिनीवर खाली पडली आणि लढाई उत्तरेकडे सरकत असताना टिपागडाच्या रांगेतील एका मागे पडलेल्या व्यक्तीने ती उचलली. हा माणूस ती चप्पल घेऊन टिपागडावर पळून गेला आणि त्याने राणीला ती नक्षीदार चप्पल दाखवून राजा हरला आणि तिचा स्वामी मारला गेला, असे सांगितले. पण त्या कणखर राणीने अश्रू ढाळले नाहीत. तिने स्वतःला रेशमी वस्त्रांनी आणि रत्नालंकारांनी सजवले. नक्षीदार चप्पल छातीशी ठेऊन बैल-रथावर आरूढ होऊन ती तलावाच्या काठी निघाली. ती तटबंदीजवळ एका ठिकाणी थांबली आणि तिळाच्या दाण्यांनी भरलेला तिचा उजवा हात स्वर्गाकडे उंचावून किल्ल्याच्या तटबंदीचे रक्षण करणार्‍या देवी भवानीला तिने प्रार्थना केली की "हे देवी भवानी, येणाऱ्या काळात, भविष्यात कोणीही तुझ्यावर राज्य करू नये. जोपर्यंत माझ्या हातातल्या तिळाचे दाणे राहतील तोपर्यंत ह्या तटबंदीजवळ आमच्या शत्रूंच्या डोक्यांचा ढीग लागू दे." मग तिने बैलांना तिच्या समोरच्या उंच उतारावरून खाली आणले आणि सरळ तलावात घातले. बघता बघता तिच्या डोक्यावरून पाणी गेले. राणी तलावातील पाण्यात दिसेनाशी झाली. दरम्यानच्या काळात, छत्तीसगडचे सैन्य पूर्णपणे तुटून पडले होते आणि पुरम राजा ढोल-ताशांच्या गजरात विजयी होऊन परतला. परंतु, जेव्हा तो त्याच्या गडाच्या कमानदार प्रवेशद्वारातून अभिमानाने प्रवेश करत होता, तेव्हा त्याला गडावर झालेल्या भीषण घटनेबद्दल समजले. गडावर पुढे जाताना त्याने त्याच जागेवर लगाम लावला. जिथे त्याच्या पत्नीने शेवटचा श्वास घेतला होता, तिथेच खोगीरातून उतरून त्याने तलावात डुबकी मारली आणि त्यानेही जलसमाधी घेतली. ह्या संपूर्ण घटनाक्रमामुळे त्या दिवसापासून टिपागड ओसाड झाला आणि त्याचे राज्य नाहीसे झाले. 

    तलावाच्या पलीकडे आपणास एक मंदिर नजरेस पडते. त्या मंदिराकडे जाण्यासाठी तलावाच्या डाव्या बाजूने पुढे जायचे. या वाटेने जात असताना आपल्या डाव्या बाजूचा डोंगर म्हणजे टिपागड होय. स्थानिक लोकांनी या मंदिराच्या अलीकडेच दक्षिण दिशेला एक सभामंडपासारखी दिसणारी वास्तू बांधली आहे. जिचा उपयोग देवीसाठी नैवेद्य बनवण्यासाठी किंवा आलेल्या भाविकांना आराम करण्यासाठी वगैरे  केला जाऊ शकतो. या वास्तूपासून उत्तरेकडे काही पावलांवर गडकुरी मातेचे मंदिर आहे. या मंदिरात सुबक अशी गडकुरी देवीची मूर्ती आहे तसेच देवीच्या उजव्या बाजूस हत्ती आणि डाव्या बाजूस घोडा आहे. दरवर्षी होळीच्या दिवसात येथे चार-पाच दिवस यात्रा भरते. या यात्रेसाठी गोंदिया, भंडारा, गडचिरोली, छत्तीसगड या भागातून आदिवासी लोक एकत्र येतात. या मंदिरासमोरून पश्चिम दिशेलाही तटबंदीचे अवशेष आपणास पाहावयास मिळतात. गडकुरी मातेच्या मंदिराजवळून पुढे जाऊन तलावालगतच असणाऱ्या महादेवाचे दर्शन घेऊन पुन्हा माघारी फिरावे.

गडावरील गडकुरी मातेची मूर्ती

    महादेवाचे आणि गडकुरी मातेचे दर्शन घेऊन मंदिरापासून काही पावले मागे येऊन उजव्या हाताच्या पायवाटेने गड चढण्यास सुरुवात करावी. ही वाट थेट बालेकिल्ल्यावर जाते. साधारण वीस-पंचवीस दगडी पायऱ्यांची वाट चढून गेल्यावर उजव्या बाजूच्या तटबंदीतून एक वाट खाली उतरते. इथे तटबंदीला लागून दगडी पाषाणाला शेंदूर लावलेले देवीचे ठाणे आहे. कदाचित, वरच्या कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे राणीने भवानी मातेला इथेच प्रार्थना केलेली असावी. इथून पुन्हा बालेकिल्ल्याची वाट धरावी. 

बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या

तटबंदीमधील भवानी देवी

बालेकिल्ल्याच्या या बऱ्यापैकी खड्या चढणीच्या वाटेवर मध्यम आकाराच्या खूप दगडी शिळा आहेत. मंदिरापासून साधारण पंधरा मिनिटामध्ये आपण एका गुहेसमोर पोहोचतो. ह्या गुहेच्या बाहेर "जय माता दी" कोरलेलं असल्यामुळे आतमध्ये देवीचे ठाणे आहे हे लक्षात येते. या गुहेमध्ये वाकून प्रवेश करावा लागतो. गुहेच्या प्रवेशद्वारावर डाव्या हाताला घोड्याची मूर्ती ठेवलेली आहे. स्थानिक लोक त्यास गुरुबाबा म्हणून संबोधतात. याच गुहेच्या डाव्या बाजूस गेले असता आपल्याला बालेकिल्ल्याची तटबंदी नजरेस पडते. परंतु, फार झाडी वाढल्यामुळे आपणास पुढे जात येत नाही. त्यामुळे गुहेच्या उजव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने वर गेल्यावर लगेचच आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करतो.

बालेकिल्ल्यावर जाताना वाटेत लागणाऱ्या शिळा

गडावरील गुहामंदिर

गुहेतील देवीचे ठाणे

    बालेकिल्ल्यात प्रवेश करताना तिथे दिसणाऱ्या अवशेषांवरून पूर्वी तिथे दरवाजा असणार ह्याचा आपणास अंदाज येतो. बालेकिल्ल्यावर आपल्याला उजव्या बाजूला तटबंदी आणि डाव्या बाजूला घरांचे किंवा वाड्यांचे अवशेष पाहावयास मिळतात. नेहमीप्रमाणेच वाढलेल्या झाडांनी हे अवशेषही  गिळले आहेत. थोडे पुढे गेल्यावर वीस-पंचवीस फुटी दगडी शिळा आपले स्वागत करतात. एका शिळेखालून दुसऱ्या शिळेखाली, दुसऱ्या शिळेखालून तिसऱ्या शिळेखाली असे करत करत आपण मार्ग काढत पुढे सरकत राहतो. या वाटेवर आपल्याला 'शोले' या हिंदी भाषेतील चित्रपटातील गब्बरसिंगच्या ठिकाण्याची आठवण आल्याशिवाय रहात नाही. काहीतरी नवीन, काल्पनिक गोष्ट पाहिल्यासारखे हरकून जाऊन पावले आपोआप पुढे पडत राहतात. ह्या शिळांखाली बऱ्याच ठिकाणी मोकळी जागा राहिल्यामुळे त्याला गुहेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेवटी पुढे गेल्यावर आपण गडावरील सर्वात उंच शिळेजवळ जाऊन पोचतो आणि हीच गडावरील सर्वात उंच जागा आहे. 


बालेकिल्ल्यावरील घरांचे अवशेष

बालेकिल्ल्यावरील दगडी शिळा

बालेकिल्ल्यावरील दगडी शिळा

बालेकिल्ल्यावरील दगडी शिळा

बालेकिल्ल्यावरील सर्वात उंच शिळा

    त्या उंच शिळेवरून आपणास आजूबाजूचा परिसर न्याहाळता येतो. गडाच्या पश्चिमेस दूर-दूरपर्यंत केवळ आणि केवळ घनदाट जंगलाचा आस्वाद आपण घेत असतो. इथेच आपला पूर्ण गड पाहून होतो. अद्वितीय नैसर्गिक वनसंपदा लाभलेल्या वनदुर्गांपैकी हा एक वनदुर्ग एकदा जरूर पाहावा असाच आहे. 

    टीप : हा किल्ला नक्षलग्रस्त भागात येत असल्याने स्थानिक वाटाड्या सोबत घेऊन आणि आवश्यक ती काळजी घेऊन पाहावा.

    ऐतिहासिक संदर्भ : राजपत्र - महाराष्ट्र शासन

टिप्पण्या